नवी दिल्ली : इंडिगो ही भारतातील सर्वात मोठी विमानसेवा कंपनी आहे. पण मागील चार ते पाच दिवसांपासून इंडिगो अनेक अडचणींचा सामना करत आहे. इंडिगोच्या अनेक विमानांचे उड्डाण रद्द झाले आहे, तर काही विमानांच्या उड्डाणाला विलंब झाला आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे. हा सर्व गोंधळ फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (एफडीटीएल) च्या नियमांमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे.
या संपूर्ण प्रकरणात केंद्र सरकार आता अॅक्शन मोडवर आलं आहे. इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्याने तिकीट दरांत प्रचंड वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर केंद्र सरकारने तातडीने नवे नियम लागू केले. दरम्यान, इंडिगोची विमानसेवा नेमकं कशामुळे विस्कळीत झाली? यासाठी नेमकं जबाबदार कोण? याबाबत केंद्रीय नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मोठं भाष्य केलं आहे. इंडिगोचा हा अत्यंत बेजबाबदारपणाफ असल्याचं मंत्री मोहोळ यांनी म्हटलं आहे. तसेच या प्रकरणात समिती नेमण्यात आली असून अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचं मंत्री मोहोळांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
इंडिगोच्या झालेल्या या गोंधळामुळे प्रवाशांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. खरं तर इंडिगोच्या व्यवस्थापनाने मागच्या दोन ते तीन महिन्यांत काही तांत्रिक गोष्टी करायला हव्या होत्या, त्या न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. आपल्या देशातील विमान सेवा देणार्या ज्या कंपन्या आहेत, अहमदाबाद दुर्घटनेनंतर पायलट असोशिएशनने अशी मागणी केली होती की आमचा १० तासांचा कालावधी कमी करून ८ तासांचा केला जावा. दिल्ली उच्च न्यायालयाने त्या संदर्भातील निर्देश दिले होते. त्यानंतर ताबडतोप डीजीसीएने सर्व विमान कंपन्यांना तसे निर्देशही दिले होतेफफ, असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.
फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन या नियमांची अंमलबजावणी दोन टप्प्यात करण्यात यावे असे निर्देश देण्यात आले होते. मात्र, इंडिगोने शेवटपर्यंत त्यावर कोणतंही काम केलं नाही. त्यामुळे १० तासांच्या कामाचा अवधी ८ तासांवर आला आणि त्यातच पायलट आणि विमानांमधील क्रू सदस्यांची कमतरता आणि त्यात कामांचा कालावधी दोन तास कमी झाला. त्यामुळे मनुष्यबळाची अचानक कमतरता जाणवली. त्यामुळे इंडिगोच्या व्यवस्थापनावर अचानक ताण वाढला आणि संपूर्ण गोंधळ उडालाफफ, असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.
त्यानंतर भारत सरकारने गंभीर दखल घेतली आणि तात्काळ काही आदेश दिले. सर्वात आधी आता संपूर्ण व्यवस्था सुरळीत सुरू होण्यासाठी इंडिगोला काही कालावधी लागेल. त्यामुळे फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन नियमांना फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डीजीसीएने चार सदस्यांची समिती नेमली आहे. तसेच डीजीसीएने शनिवारी इंडिगोला कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे. चार सदस्यांची समितीचा अहवाल आल्यानंतर नक्कीच पुढील कारवाई केली जाईल. आम्ही पहिल्या दिवसांपासून सांगितलं की झालेला प्रकार हा अतिशय बेजबाबदारपणाचा आहे. आता समितीने चौकशी केल्यानंतर जी काही माहिती समोर येईल त्या प्रमाणे कारवाई होईलफफ, असा इशारा मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे.